Tuesday, August 20, 2019

विचारवंत

मी जग बदलण्याचा केला होता एकदा प्रयत्न

वृक्षारोपण करून पाहीले, जागेवरून बाचाबाची झाली.

स्वच्छता मोहिम करायची म्हटली, घरचे म्हणाले "तेवढं कपाट आवर आधी!"

शिक्षक बनलो.
म्हटलं पुस्तकाबाहेरचंही शिकवावं,
तर दाखवली अनुक्रमणीका आणि दिली सोडचिठ्ठी पहिल्याच चाचणीपूर्वी.

माझ्या धर्मातल्या चार गोष्टी बर्‍याही वाटल्या सांगाव्याशा..
अनामिक podcast पुरतंच ते वादग्रस्त प्रकरण राहिलं बरं झालं..
बरं झालं उत्साहाच्या भरात घरावर झेंडा लावणार होतो तेवढं नाही केलं

प्लास्टिक बंदीला सहमती दर्शवली,
मुळात प्लास्टीक निर्मात्यांवर काय काय बंदी आलेय ह्या पेचात पडलो थोडासा

अमुक ठिकाणी येणार का असं रिक्षेवाल्याला 'विनम्र'पणे मातृभाषेत विचारलं
त्याच्या मातृभाषेत बहुतेक न बघितल्यासारखं करून निघून गेलं की 'नाय!' समजत असावेत.

सगळंच तिरकं होऊ लागल्यावर मग मात्र माझ्या चांगुलपणाने बंड पुकारलं

आंधळ्या काकांना पलिकडे जायचं नसतानाच रस्ता ओलांडून दिला

ट्रॅफिकमध्ये मुद्दाम self proclaimed police बनून कल्ला सोडवण्याच्या बहाण्याने उलट्याच दिशेने सोडले दुचाकीवाल्यांना

आपल्या आपल्या धर्माचं जतन करणार्‍या डोळस मूर्खांनाच म्हणू लागलो धर्मांध
वृत्तवाहिनीकडून अॉफर आली एका

मतदान सोडून इतर प्रत्येक दिवस माझे जाहीर मत आगंतुक पाहुण्यांसारखे लादू लागलो

वादात पडलो, की जिथे इतिहासाची चर्चा सुरु असेल तिथे भविष्याबद्दल आणि जिथे वर्तमान प्रश्न मांडला आहे तिथेच भूतकाळावर विषय फोडून पाहिले

जो गट मोठा, त्यांच्या बाजूचा मी झालो.

आता मला सगळे विचारवंत म्हणू लागले आहेत.


No comments:

Post a Comment