Wednesday, May 13, 2020

तेच ते

परवा स्पृहा जोशीच्या लाईव्ह मध्ये सुबोध भावेंनी सादर केलेली कविता मनात घर करून बसली आहे. विंदांचं सादरीकरण हे त्याहून भावलं, खरंच एखाद्या कवीच्या तोंडूनच त्याची कविता ऐकणं भाग्याचं आहे.
मागील अर्धं वर्षभर नोकरी नसल्यामुळे घरीच होते तेव्हा तेच ते करून जाम कंटाळा येत असे. जेव्हा जॉब होता, तेव्हा तेच मरत मरत ट्रेन प्रवास करून जाणं, आय आय टी ला येणार्‍या रिक्षा न मिळाल्याने, पावसाने, लोकल प्रॉब्लेम मुळे उशीर होणं, उशीर होण्याची कारणंही तीच ती ऐकून सर वैतागलेले, पावसाळ्यात कुठे जवळ ट्रेक ला जावं तर तीच ती गर्दी, लांब जावं तर तीच ती बॅग, तेच ते कपडे, तोच ग्रुप, तीच माणसं. शेवटी जॉब सोडल्यावर एक नवी बॅग (ट्रेक करू लागल्यापासून पहिलीवहिली पॉश बॅग) अॉफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी दिली. अजून डॅन ब्राऊनचं पुस्तक दिलेलं त्याचा नंबर लागायचाय. बॅग एक नंबर आहे, एवढे वर्ष हेच सामान का आपण न्यायचो, आता बिलकूल जड वाटत नाही तेच ते सामान ह्या बॅगेतून नेताना.
कामं खूप वाढलीयेत खरं तर लॉकडाऊन मुळे, घरचीच नाही, बाहेरचीपण. काही लिखाण, काही कोडींग सगळंच करायचंय. OS बदलायचीये, तीपण तीच ती झालेय (७ खिडक्या). दिवसभरात आणि उशीरा रात्रीपर्यंत त्याच त्या धाटणीच्या सिरियल्स पण खूप होत आहेत बघून. पण हे कवितांचं, रेणुका देशपांडेंच्या करामती पाहण्याचं आणि रात्री अनुष्का शंकरचं सतार वादन ऐकायचं मात्र नवीन आहे थोडं.
जे असतं त्या तेच ते मध्ये थोडे बदल करून तेवढंसं नवेपण आपलंसं करून घ्यायचं. आपल्याच कुठल्यातरी पुस्तकात वाचलेलं छापील ज्ञान त्याच त्या इन्स्टाग्राम सेल्फ-लव्ह पोस्ट सारखं फक्त इतरांना न सांगता जीवनात आणू पहायचं. स्वत:ल‍ थोडं कमी गृहीत धरायचं. घरी राहणं मग तेच ते वाटेनासं होतंय. सगळे सुदृढ आहोत, एकत्र आहोत म्हणून असावं. लाईव्ह मधून अनेकांच्या भेटी-संवाद होत आहेत, माणसं socially distant असली तरी personally close होत आहेत. त्यातही थोडाफार का होईना, तोच तोचपणा आणि सगळे-करतायत-म्हणून पणा आहे, हे नाकारता येत नाही.
ज्या बिचार्‍या लोकांना कोरोना मुळे क्वारंटीन केलंय कुटुंबापासून दूर, किंवा पोलिसात-दवाखान्यात असल्यामुळे कोरोना झाला आहे, त्या सर्व भाऊबंधांसाठी हा तोच तो काळ सुसह्य आणि आरोग्याकडे नेणारा जावो. लवकर बरे व्हा. जे याही परिस्थितीत खूप प्रकारे लोकांची मदत करत आहेत, त्या सर्व मेकर्स, सोशल वर्कर्स, मदतनीसांना शुभेच्छा! असंच तुमचं तेच ते उत्कृष्ट कार्य करत रहा!
You are the real heros. आम्हीच काय ते तेच ते.

No comments:

Post a Comment